साताऱ्यात डी-मार्टजवळ दुर्घटना; बसची ट्रकला पाठीमागून धडक; अठरा जखमी
सातारा – पुणे-बेंगलोर महामार्गावर म्हसवे (ता. सातारा) गावच्या हद्दीत डी-मार्ट मॉलजवळ गुरुवारी (दि. 12) पहाटे खासगी बस व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसचालकासह सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अठरा प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडून बंगळुरूला निघालेल्या एसआरएस या ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसने म्हसवे गावच्या हद्दीत महामार्गावर ट्रकला पाठीमागून धडक दिली. टायर अचानक फुटून ट्रक थांबल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अब्बास अली इब्राहिम काटगी (वय 49, रा. अनघोल, बेळगाव), विश्वनाथ वीरप्पा गड्डी (वय 58, रा. संकेश्वर, बेळगाव), अशोक रामचंद्र जुनघरे (रा. दिवदेववाडी, ता. जावळी, जि. सातारा), डॉ. सचिन शंकर गौड-पाटील (वय 35, रा. संकेश्वर, बेळगाव), गुड्डू तुकाराम गावडे (वय 38, रा. मोदगी, जि. बेळगाव), जुगल सुरेश जाधव (वय 26, रा. मालदेववाडी, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, एसआरएस कंपनीची खासगी बस (केए-01-एसएफ-9506) मुंबईकडून बेंगलोरला निघाली होती. बसमध्ये दोन चालक, एका क्लीनरसह 33 प्रवासी होते. ही बस गुरूवारी पहाटे म्हसवे (ता. सातारा) गावच्या हद्दीत आली असता पुढे निघालेल्या मालट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यातच थांबला असता पाठीमागून भरधाव असलेल्या बसची ट्रकला जोराची धडक बसली. या धडकेत बसचालक व पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 18 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघात झाला त्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते.
दुर्घटनेतंर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने काही वेळ गोंधळाचे वातारवण निर्माण झाले होते. महामर्गावरून निघालेल्या वाहनचालकांनी या अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी प्रवाशांना साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही घटनास्थळी भेट दिली. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक सजन हंकारे तपास करत आहेत.