गणेश विसर्जन संदर्भात पालिका व पोलीस प्रशासनाला सूचना
कराड – गुरुवार, दि. 12 रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. येथील मुख्य रस्त्याची पाहणी करत मनोऱ्याजवळ जाऊन मुस्लिम बांधवांची भेट घेतली.त्यानंतर प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पोलिसांसह नगरपालिका प्रशासनास त्यांनी विसर्जन संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, किशोर धुमाळ, यांचेसह नगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते. विसर्जन मार्गाची व नदीपात्राची पाहणी झाल्यानंतर डॉ. सुहास वारके म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत तसेच विसर्जन ठिकाणी लाईटची सुविधा करण्याची सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने याठिकाणी जास्तीत जास्त बोटी व तराफ्याची व्यवस्था व्यवस्था करून यातून लहान गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाच्या खालील बाजूस भाविक नदीपात्रात कमी जावेत, यासाठी नदीपात्रालागत मोठ्ठा खड्डा खणावा त्यामुळे त्या खड्डयामध्ये गणपती विसर्जन करता येईल.
गणेशभक्तांनी गणपती विसर्जन शांत व शिस्तप्रिय करावे पोलिसांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे. गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने पोलिसांची बैठका घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबतही पोलिसांना आवश्यक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीपासून ते विसर्जन ठिकाणापर्यंत पोलिसांसह प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेतल्याचे डॉ.वारके यांनी सांगितले.