रायपुर: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने रद्द केले असून, ते अदिवासी जमातीचे नाहीत असे या समितीने जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खोटे जात प्रमाण पत्र मिळवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत.
आपण आदिवासी असल्याचे सांगणारा त्यांचा दावा या आधीही अनेक वेळा फेटाळला गेला आहे. बिलासपुर जिल्हा प्रशासनाच्या आदेशवरून गुरूवारी रात्री त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून खोटे जात प्रमाण पत्र जवळ बाळगल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले आहेत. अजित जोगी हे विद्यमान आमदार आहेत, पण त्यांना अजून त्या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही. आमच्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हा गुन्हा म्हणजे राजकीय सूडाची कृती आहे असे त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी म्हटले आहे.