वाडा येथील वीज कंपनीच्या कार्यालयातील घटना
राजगुरुनगर (प्रतिनिधी)- वाडा ता खेड येथील वीज वितरण विभागाच्या उपमंडल कार्यालयातील कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज केल्यावर ती द्यायला टाळाटाळ केल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीच्या कार्यालयातील यंत्र चालकाने कनिष्ठ अभियंत्यावर थेट लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत कनिष्ठ अभियंत्याच्या हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर अभियंत्यावर हल्ला करणा-या बाळकृष्ण नागू पालेकर,वय ५८,रा वाडा,ता खेड यांच्या विरोधात खेड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर सदाशिव बोरचटे,वय ३३,रा.पडाळवाडी,राजगुरुनगर असे जखमी अभियंत्याचे नाव आहे.
निवृत्तीसाठी अवघे चार महिने राहिले आहेत. पत्नी आजारी असून तिच्या देखभालीसाठी राजा मागितली. त्यावर वयस्कर असून मला उलट उत्तरे मिळाली. माझी सून याच खात्यात वरिष्ठ अधिकारी आहे.अडचण जाणून घेण्यासाठी हवे तर तिच्याशी फोनवर बोला असे म्हटल्यावर बोरचटे यांनी अर्वाच्य भाषा वापरली.शिवाय त्याना मी मारहाण केली नाही असे पालेकर यांचे म्हणणे आहे.पोलिसांनी त्यांचीही तक्रार नोंदवून घेतल्याचे सांगण्यात आले.
महावितरण कंपनीच्या वाडा कार्यालयात बुधवारी(दि२८) ही घटना घडली. हल्लेखोर बाळकृष्ण पालेकर यांनी कनिष्ठ अभियंता असलेल्या ज्ञानेश्वर बोरचटे यांच्याकडे घरगुती अडचण असल्याचे सांगून २ ते १२ सप्टेंबर दरम्यान रजा मिळावी असा अर्ज केला होता. त्यावर काय निर्णय झाला याची माहिती घेण्यासाठी पालेकर हे बुधवारी दुपारी बारा वाजता कार्यालयात गेले होते. वाडा येथील वीज वितरण कार्यालयात १६ कामगार असून त्यातील एका यंत्र चालकाने अगोदरच रजेसाठी अर्ज केला आहे.
गणेशोत्सव असल्याने या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी रजा देता येणार नाही असे बोरचटे यांनी सांगितले. तसेच रजेसाठी वरिष्ठांशी संपर्क करा असेही सुचवले. त्यावर मला जाणीवपूर्वक रजा देत नाही असा समज करून घेत पालेकर यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात जवळच असलेल्या रॉडने हाताच्या कोपरावर तसेच दोन्ही पायांच्या नडग्यांवर मारहाण केली असे बोरचटे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. बाळकृष्ण पालेकर याना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सहनिरीक्षक निलेश बडाख यांनी सांगितले.