राजगुरुनगर (प्रतिनिधी)- राजगुरुनगर जवळच्या थिटेवाडी, ता खेड येथे घरात केवळ महिला, मुली असल्याचा सुगावा साधून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून तीन चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून घरातील दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि२८) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली.
राजगुरूनगर शहराच्या नजीक असलेल्या थिटेवाडीत दमयंती बाजीराव पिंगळे,वय ६५, यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. यात विशेष म्हणजे घरात असलेल्या या वृद्धेने व नाती असलेल्या दोन मुलीनी चोरट्यांचा जोरदार प्रतिकार केला. दरवाजा उघडला जात असताना आतून तो दाबून धरत आरडा-ओरडा करून चोरट्यांना बराच वेळ थोपवून धरल्याचे सांगण्यात आले.
याबाबत खेड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,थिटेवाडी येथील दमयंती पिंगळे यांच्या घरी पुरुष नसल्याची खात्री अज्ञात चोरट्यानी घरातील सर्व झोपेत असताना सव्वा दोन वाजता हे चोरटे आले. त्यांनी बाहेरून दरवाजा वाजवला. त्यावेळी दमयंती पिंगळे जाग्या झाल्या. त्यांनी झोपताना बंद केलेली अंगणातील लाईट सुरु केली.
मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. अशातच काही वेळाने बाहेरून कोणीतरी दरवाजा जोरात ढकलत असल्याचे त्याना जाणवले. आरडा-ओरडा केल्याने मुली जाग्या झाल्या. सर्वानी दरवाजा आतून दाबून धरला. यावर बाहेरील व्यक्तींनी दरवाजा उघडायला अधिक जोर लावला.त्यात तो उघडला. काळसर कपडे,जर्किन्स,तोंडावर माकड टोपी घातलेले तिघेजण होते. त्यातील दोघेजण घरात शिरले. त्यांच्या हातात कोयता होता. कोयत्याचा धाक दाखवून शांत राहण्यास सांगितले.
वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,डोळा हे दागिने काढून घेतले. कपाट उचकटले मात्र त्यातील काहीही त्याना सापडले नाही. त्यावर ठेवलेल्या लोखंडी पेट्या काढल्या. त्यातील लपवून ठेवलेली ३५ हजार रोख रक्कम व दागिन्यांसह या पेट्या चोरटे घेऊन पळून गेले. अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र,अडीच तोळ्याचा डोळा,अर्धा तोळ्याची चैन,एक तोळ्याचा नेकलेस,बांगड्या,मण्याची पोट,कानातील रिंगा व ३५ हजार रुपये असा मिळून १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला.या घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान पिंगळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा अज्ञात तीन चोरट्यांवर दाखल केला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहेत.