कार्यकर्त्यांच्या चिंतन मेळाव्यात राष्ट्रवादीची उमेदवारीची मागणी
नेवासा – नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत नेवासा विधानसभा मतदार संघातून विठ्ठलराव लंघे यांनीच उमेदवारी करावी, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला. उमेदवारीसाठी जुन्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असल्याचे चित्र मेळाव्यात स्पष्ट झाले आहे.
गिडेगाव येथे राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके यांच्या वस्तीवर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार मंथन मेळावा पार पडला. यावेळी अनेकांनी लंघे यांनीही उमेदवारी करावी. त्यांना तन-मन-धनाने मदत करू, अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ म्हणाले, तालुक्यात शेवटच्या भागापर्यंत पाटपाणी येत नाही. त्यासाठी आपलाच लोकप्रतिनिधी हवा आहे. युवक प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे म्हणाले, लंघे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. जो निर्णय घ्यायचा आहे, त्यावर ठाम राहा.
ज्ञानेश्वर कारखान्याचे तज्ज्ञसंचालक राजेंद्र मते यांनी जनता दुष्काळात होरपळत असतांना स्वतःला नेते म्हणवून घेणारे कुठे गेले होते. मुळा धरणातून बीड वॉटर ग्रीडला विरोध करण्याची कोणाची हिम्मत नाही. उमेदवारी जाईल म्हणून भाजपचे तीनही आमदार मूग गिळून आहेत. नेवासा तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले म्हणाले, केवळ पैशावर निवडणुका होत नाहीत, तर जनतेच्या मनात असत तेच निवडून येतात. आतापर्यंत सर्वांना संधी दिली. यावेळी विठ्ठलरावांना संधी द्या.
लंघे म्हणाले, नेवासा तालुका उजाड होत असताना आजी-माजी आमदार सर्वसामान्य जनतेला केवळ भूलविण्याचे काम करीत आहेत. विकासाचा आभास निर्माण केला जात आहे. पाटपाण्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे.जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना नेहमीच तालुक्याला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य जनतेने प्रत्येक निवडणुकीत व माझ्या राजकीय वाटचालीत तन मन धनाने मदत केली. पद असो वा नसो जनतेत राहून जनतेची कामे करत राहू. जो निर्णय होईल, तो मान्य असेल.
शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी दोन दिवसांत रास्तारोको करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लंघे यांनी सांगितले.
माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, विठ्ठलरावांची उमेदवारी पक्की आहे. त्यामुळे मनात संभ्रम ठेवू नका. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा हा मतदारसंघ आहे.
कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी घ्या. कामाला लागा. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, प्रा. नारायण म्हस्के, नामदेव निकम, अशोक वायकर, अंबादास गोंडे, राधाकृष्ण भागवत, बबनराव पिसोटे, काकासाहेब म्हस्के, भीमराज शेंडे, अनिल हापसे, प्रदीप ढोकणे, योगेश रासणे, नानाभाऊ नवथर, डॉ. गुलाबराव नजन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.