पुणे-पालिका अधिकाऱ्यांनी आंदोलन केल्याने ते मुख्यसभेत आले नाहीत, तर कायमच अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या सदस्यांनी बुधवारी चक्क त्यांची बाजू घेत भाषणे केली. महापालिकेचे संपूर्ण सभागृह अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि या प्रकरणी सर्व पक्षनेत्यांसह आपण पोलीस आयुक्तांची भेट घेऊ, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात दिली. पोलिसांचा निषेध करून मुख्यसभा कार्यपत्रिका तहकूब करण्यात आली.
आपण अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.असे केले नाही तर ते काम करणार नाहीत, असे मत अजित दरेकर यांनी मांडले. चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असतील तर हा सभागृहाचा अवमान आहे, असे विशाल तांबे म्हणाले. गुन्हा दाखल करताना अधिकाऱ्यांची नावे नव्हती, मग आरोप पत्रामध्ये नावे कशी आली, असा सवाल सुभाष जगताप यांनी विचारला.
या प्रकरणात अधिकाऱ्यांना गोवण्यात आले. यापूर्वीही कनिष्ठ अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. आपण आपले हक्क दुसऱ्यांना दिल्याचे हे परिणाम असल्याचे चेतन तुपे म्हणाले.
महापालिकेने पोलिसांना कोणत्या कोणत्या जागा दिल्या आहेत, त्या किती कालावधीसाठी दिल्या हे तपासून त्या परत घ्याव्यात, असे सुनील मेंगडे म्हणाले. इतरांना वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना गोवण्यात आले. यामुळे महापालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केले जात आहे. अधिकाऱ्यांना संरक्षण नाही दिले तर कामे होणार नाहीत, असे मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचा कायदेशीर जबाबदारी खर्च महापालिकेने करावा, असे पृथ्वीराज सुतार म्हणाले.
सनदी अधिकारी आणि वर्ग 1 आणि 2 च्या अधिकाऱ्यांवर वेळ आल्यावर सगळे पळापळ करतात. मात्र त्याखालील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर कोणीच काही करत नाही, असे महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे म्हणाले.
अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याप्रकरणी सर्व नगरसेवक पोलीस आयुक्तालयासमोर जाऊन बसू. बढती होऊन वेतन कमी होते. सत्ताधारी काय झोपा काढत आहेत का?, असा सवाल विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी उपस्थित केला.
याप्रकरणी पालिकेने गुन्हे का दाखल केले नाहीत, असा प्रश्न उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित केला. तर संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला जाईल. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि साकडे घालू. पोलीस आयुक्तांना भेटून सांगू, असे आश्वासन सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना सभागृहात येण्याची विनंतीही केली.
अभियंत्यांचा सोमवारपासून कामबंदचा इशारा
कोंढवा येथील इमारतीची सिमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापालिकेच्या 2 अभियंत्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी पालिका अभियंता संघाच्या वतीने बुधवारी काळ्याफित लावून काम बंद आंदोलन केले. तसेच, याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास सोमवारपासून बेमुदत कामबंदचा इशारा दिला. दरम्यान, अभियंत्यांच्या या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसला आहे. महापालिका अभियंता संघ आणि इतर कर्मचारी संघटनांनी बुधवारी महापालिकेच्या कामकाजात सहभाग घेतला नाही. काम बंद आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. पालिका इमारतीसमोरील हिरवळीवर निषेध सभा घेतली.
अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
कोंढवा येथील सीमाभिंत दुर्घटनाप्ररकणात पालिकेच्या इमारत निरीक्षक गिरीश मनोहर लोंढे (37, रा. भवानी पेठ) आणि प्रभारी उप-अभियंता कैलास बाजीराव काराळे (50, रा. गोखलेनगर) यांनी केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. भिंतीचे डिझाईन मनपाकडे सादर केले नसल्याचे तपासातून समोर आले आहे. दोघांनी संबंधित इमारतीच्या सीमाभिंतच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलीटीकडे दुर्लक्ष का केले. तसेच याबाबत काही कागदपत्रे जमा करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी घेणे गरजेचे असल्याची मागणी पोलीस आणि सरकारी वकिलांनी केली होती.