मुंबई: लोकल मधून प्रवास करत असताना अत्यंत गलिच्छ प्रकारचा अनुभव एका तरुणीला आला आहे. प्रवासादरम्यान एक गर्दुल्ल्या गुटखा खाऊन या तरुणीचा अंगावर थुंकला आहे. शुक्रवारी रात्री वाशी स्थानकातून पनवेल कडे जात असताना हा किळसवाणा प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकाराबाबत या तरुणीने फेसबुक पोस्ट लिहून एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या प्रकरणांतर रुणालीने या गर्दुल्ल्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले परंतु तो गर्दीचा फायदघेत पळून गेला.
नेरुळ मध्ये राहणाऱ्या या तरुणीचं रुणाली पाटील असं नाव असून, ”आज माझ्यासोबत घाणेरडा प्रकार घडला. उद्या तुमच्या आई बहिणीसोबत असं घडू नये असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडीओ शेअर करा. आवाज उठवायला हवा नाही तर स्त्री माता नाही कचऱ्याची पेटी होईल”, असे तिने शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे .
तो गर्दुल्ला रुणालीच्या मागून येत अंगावर थुंकला आणि लगेच वाशीच्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला. रुणाली दुसऱ्या लोकलमधून सानपाडा स्टेशनला पोहोचली. त्यावेळी तो गर्दुल्ला चढला असलेली लोकलदेखील सानपाडा स्टेशनला आली होती. त्यावेळी रुणालीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा असे सांगितले. त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातलाय असं ऋणालीने ओरडून सांगितल्यावर काही लोकांनी त्या गर्दुल्ल्याला पकडून मारहाण देखील केली. मात्र तो त्यांच्या कचाट्यातून निसटला, असे रुणालीने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.