पुणे – मुसळधार पावसानंतर पावसाने विश्रांती घेतली; परंतु शनिवारी (दि. 24) शहरात ऊन-पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला. शहराच्या काही भागात दुपारी मध्येच पावसाची जोरात सर आली, तर काही मिनिटांनी कडक ऊन पडले होते.
कोथरूड, वारजे, येरवडा, कात्रज या भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. त्यामुळे वातावरणात बदल झाला होता. तसेच दिवसभरात कमाल तापमानात किंचतशी वाढ झाली, त्यामुळे सायंकाळी उकाडा जाणवत होता. शहरात या हंगामात आतापर्यंत 779 मिमी पावसाची नोंद झाली असून, आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, पुढील काही दिवस पावसाचा खंड राहिल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, हा खंड किती दिवसांचा असेल, हे ठोस सांगण्यात आले नाही. त्यामुळे गणेशोत्सवात पावसाचे पुनर्आगमन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमानात एक ते दोन अंशांने वाढण्याची शक्यता आहे. तर, दि. 26 नंतर पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे.