नवी दिल्ली – चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो पाठवला असून हा फोटो चंद्रापासून 2650 किमी अंतरावरुन काढण्यात आला आहे. कालच चांद्रयान 2 ने त्याचा अवघड टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. 21 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी या यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे.
14 ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान 1 च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे. चांद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर, लॅंडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या 14 दिवसांबरोबर असतो. आता याच चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिलावहिला फोटो पाठवला आहे.