थेऊर – थेऊर (ता. हवेली) येथे दुचाकीवरून चाललेल्या एकास तिघांनी अडवून वस्तीवरील मुलीस छेडले या कारणांवरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व लोखंडी सळईने मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगारांचा तपास घेत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी सांगितले.
याप्रकरणात रोहित सुरेश उदावंत (वय 35, रा. वर्धमान इनक्लू, जास्वंदी बिल्डिंग आंबेगांव पठार, धनकवडी, पुणे. मूळ रा. मुंबई बजार, शिरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, रोहित हे वॉटर फिल्टर सेल्स आणि सर्व्हिसचे काम करतात. मंगळवार (दि.20) दुपारी 1:30 च्या सुमारास कामानिमित्त हडपसर गाडीतळ येथे ते थांबले होते, तेथे एक अनोळखी मुलगी एकसारखी पाहत असल्याने रोहित यांनी मोबाइल नंबर कागदावर लिहून तो कागद टाकून ते निघून गेले. 4:00च्या सुमारास वैभव चित्रपट गृहात चित्रपट पाहत असताना मध्यांतरास मिसकॉल दिसल्याने त्यांनी त्यावर संपर्क केला असता मुलगी बोलू लागली. तिने कवडीपाट टोलनाका येथे भेटण्यासाठी बोलावले. रोहित हे दुचाकीवरून तेथे गेले. त्यानंतर ती थेऊरकडे चल म्हणाली, तिने आपले नाव गौरी गवळी असल्याचे सांगितले. थेऊर फाटा उड्डाणपूलाखाली बोलत असताना तीन अनोळखी तरूण रागाने पाहात असल्याने रोहितने तिला तेथेच सोडून थेऊरकडे निघाले. त्यावेळी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते थेऊर रस्त्यावरील गाढवेमळा येथील वळणावर दोन दुचाकीवरून 25 ते 30 वयोगटातील तीन तरूणांनी रोहित यांना अडवून आमच्या वस्तीवरील मुलीस का छेडतो, असे म्हणत धारदार कोयते व गजाने जबर मारहाण केली. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवून रोहितला रिक्षात टाकून लोणी स्टेशन येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.