19 ऑगस्टपासून दिले जाणार प्रशिक्षण; महिना अखेरीस उद्घाटन
नगर – नगरच्या एमआयडीसीमध्ये सुरु होत असलेल्या आयटी पार्क मध्ये नोकर भरतीसाठी दोन कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना मंगळवारी दुपारी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या सर्व निवडलेल्या उमेदवारांना दि.19 ऑगस्ट पासून प्रशिक्षण दिले जाणार असून महिना अखेरीस आयटी पार्कचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती आ.जगताप यांनी दिली. पहिल्या टप्प्यात 250 ते 300 युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे तर डिसेंबरपर्यंत सुमारे 1 हजार पेक्षा जास्त युवक-युवती आयटी पार्कमध्ये कार्यरत होणार आहेत.
नगर एमआयडीसीत गेल्या 19 वर्षांपासून धुळखात पडलेल्या आयटीपार्क इमारतीचे आ. जगताप यांनी पुढाकार घेऊन रुप पालटले आहे. याठिकाणी सात ते आठ आयटी कंपन्या लवकरच कार्यरत होणार आहेत. त्यातील दोन कंपन्यांनी नोकर भरतीसाठी मुलाखती घेवून निवड झालेल्या युवक-युवतींना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये 12 वी पासून ते पदवीधरपर्यंत तसेच पदव्युत्तर पदवी धारकांचा समावेश आहे.
शहरात विकासकामे करण्याबरोबरच तरुणांना शिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहरात आयटी पार्क सुरु होण्यासाठी सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क सुरु होता, त्यास आता यश आले आहे. येत्या 5 वर्षांत नगर शहर इतर महानगरांप्रमाणे आयटी हब म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
संग्राम जगताप आमदार