33 हजार स्क्वेअर फूट बांधकामाची इमारत
बीओटीचा यापूर्वीचा निर्णय होणार रद्द
नगर – नगरचे वैभव म्हणून नेहरू मार्केटकडे पाहिले जाते. ते मार्केट आता महापालिका उभारणार आहे. शासनाकडून नगर शहराच्या विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या शंभर कोटीच्या निधीतून हे नेहरू मार्केट उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने संबंधितांना बांधकामच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
शहरातील नेहरू मार्केटच्या मोकळया जागेची पाहणी वाकळे यांनी आज केली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक दत्ता कावरे, उपायुक्त प्रदिप पठारे, सहाय्यक नगररचनाकार के.वाय.बल्लाळ, शाखा अभियंता निंबाळकर, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे आदी उपस्थित होते. शहरातील मध्यवस्तीत असल्यामुळे नागरिकांना भाजीपाल्यासाठी एक चांगली सुविधा होती. परंतु ते मार्केट दहा वर्षापूर्वी पाडले असून अद्यापपर्यत त्यांचे बांधकाम झाले नाही.
भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विकतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून वाहतुक कोंडी होते. नेहरू मार्केट इमारत बांधकाम बीओटी तत्वावर निविदा पूर्वी काढण्यात आली होती. बऱ्याच वेळा निविदा काढूनही त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नेहरू मार्केटची इमारत मनपाच्या वतीने बांधण्यात येणार आहे. ठिकाणी अद्ययावत इमारत 33 हजार स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. मनपाच्या माध्यमातून बांधल्यामुळे मनपास उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. नविन इमारतीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना संबंधीत अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम करता येईल. या दृष्टिने कार्यवाही करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या. असे वाकळे यांनी सांगितले.