महापालिकेत मंडप परवानगी कक्ष कार्यरत
मंडपाच्या परवानगीसाठी मनपामध्ये मंगळवारपासून कक्ष कार्यरत केला जाणार आहे. परवानगीसाठी योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यास 48 तासात परवानगी दिली जाणार आहे. मंडपासाठी रस्ता खोदल्यास त्याचा खर्च संबंधित मंडळांकडून वसुल केला जाणार आहे. परवानगीचा कक्ष दि.26 ऑगस्टपर्यंत कार्यरत राहील, त्यानंतरच्या अर्जांना परवानगी दिली जाणार आहे, असे मनपाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
नगर – आगामी काळात शहरामध्ये साजऱ्या होणाऱ्या मोहरम, गणेशोत्सव सणाकरिता तरूण मंडळे, गणेश मंडळे, मोहरम यंग पार्टी धार्मिक संघटना आदींनी न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सवासाठीचे मंडप, स्टेज, उभारण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा विनापरवाना मंडप उभारणी केल्याल्या मंडळावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून समितीकडून शहरात प्रत्यक्ष फिरून उभारलेल्या मंडपाची तपासणी केली जाणार आहे. अशा तपासणीच्या वेळीस परवानगी घेतलेली नसल्यास अथवा परवानागी घेतलेली आहे. परंतु परवानगीचा तपशील मंडपाच्या दर्शनी भागावर ठळकपणे लावला नसल्यास असे मंडप विनापरवाना समजुन सदरचे विनापरवाना मंडप हटविणे, फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या कारवाई केल्या जाणार आहे.