अणे – बेल्हे (ता. जुन्नर) येथील शिवनेर वाडीतील गोठ्यात बांधलेल्या यशवंत बाळाजी गुंजाळ यांची गाभण शेळी गुरुवार (दि. 8) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने फस्त केली व दुसरी गंभीर जखमी केली.
शेळीच्या मानेला बिबट्याचे डास लागले आहेत. पहाटेच्या वेळेला गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला केला. एक शेळी जखमी करून दुसरी जवळ असलेल्या उसाच्या शेतात नेऊन फस्त केली. जवळच उसाच्या शेतात ओढून नेल्याच्या बिबट्याच्या पाऊल खुणा दिसत होत्या. यात शेतकऱ्याचं सुमारे 10 ते 12 हजार किंमतीचे नुकसान झाले आहे. दुसरा हल्ला बेल्हे जवळ असणाऱ्या पिंपळझाप (ता. जुन्नर) येथेही अशोक बाबुराव औटी यांच्या मेंढीवर गुरुवार (दि. 8) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने करून मेंढी फस्त केली. एकाच रात्रीत दोन ठिकाणे बिबट्याचे हल्ले झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंचनामा करताना त्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या. तसेच जखमी शेळीच्या मानेला खालच्या बाजूला बिबट्याचे दात लागले आहेत. एक शेळी जखमी करून दुसरी अंदाजे 1 हजार फुटावर उसाच्या शेळीला ओढत नेऊन फस्त केली. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून आपल्या जनावरांना रात्रीच्या वेळी बंदिस्त जागेत बांधून ठेवावे.
– दत्ता फापाळे, वनरक्षक बेल्हे