महापौरांचा पाणीयोजनेसह भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांना इशारा
नगर – नगर शहारात सुरू आलेल्या अमृत अभियानंतर्गत नगर पाणी पुरवठा योजना व भुयारी गटर योजना तसेच शहर पाणी पुरवठा योजना फेज-2 योजनेच्या कामास गती न दिल्यास दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेस दिला आहे.
अमृत अभियानंतर्गत नगर पाणी पुरवठा योजना, भुयारी गटर योजना, तसेच शहर पाणी पुरवठा योजना फेज-2 योजनेच्या कामाची आढावा बैठक वाकळे यांनी घेतली. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, महिला बाल व कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, नगरसेवक राहुल कांबळे, अजय चितळे, सुरज शेळके, उपायुक्त प्रदिप पठारे, मुख्य लेखाधिकारी मानकर, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख काकडे यांच्यासह काम करणारे ठेकेदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वाकळे यांनी पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत माहिती घेतली. नांदगाव ते देहरे दरम्यान अडीच किलोमीटरचे काम 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यास अडचण नाही. अशा ठिकाणी कामास गती देवून पाईपलाईन टाकण्यात यावी. कामगारांची संख्या व यंत्रणा वाढवून कामास गती देण्याचे आदेश दिले. विळद येथे सुरू असलेल्या काम चार महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.कामामध्ये कामास गती न मिळाल्यास व दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिली.
कार्यारंभ आदेश देवून एक वर्ष होवून देखील कामात प्रगती नाही. तसेच मागील मिटींगमध्ये छोट्या पाईप ऐवजी मोठया व्यासाचे पाईप लाईन टाकणे बाबत सर्व्हे करून सुधारित आराखडा व नकाशा तयार करून त्या प्रमाणे सादरीकरण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये त्यांनी व्यवस्थित सादरीकरण केले नाही. त्यामुळे त्यांना दि. 16 ऑगस्टपर्यत अद्ययावत आराखडा तयार करून सादर करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सुरू असलेल्या कामाचा 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले.
फेज-2 योजनेच्या कामाबाबत माहिती घेतली असता पाईपलाईन वितरणाचे काम 33 कि.मी.पैकी 6 कि.मी.करण्यात आले. उर्वरित काम संथ गतीने सुरू आहे. संबंधित संस्थेकडून रोज एक कि.मी.चे काम करण्याचे मर्यादा दिली आहे. कामात सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करून संबधित संस्थेस काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही देखील करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. पार्वती ऍग्रो या संस्थेकडून पाईपलाईन टाकणे व हायड्रोलिक टेस्टींगचे कामात सुधारणा नाही. हायड्रोलिक टेस्टींगचे काम 225 कि.मी.बाकी आहे.
दररोज एक कि.मी.प्रमाणे हायड्रोलिक टेस्टिंगचे काम करण्याच्या सुचना दिल्या. दिलेल्या टार्गेट नुसार काम न झाल्यास संबंधीत संस्थेचे काम रद्द करून नव्याने हायड्रोलिक टेस्ट्रीगसाठी निविदा काढणे बाबत कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या. यापुढे दर आठ दिवसांनी सुरू असलेल्या ठिकाणी समक्ष पदाधिकारी, अधिकारी, संबंधित अधिकारी ,नगरसेवक कामाची पाहणी करणार आहे. असे वाकळे यांनी स्पष्ट केले.