संगमनेर – संगमनेरात उभ्या राहिलेल्या न्यायालय इमारतीच्या उर्वरित कामांसाठी वाढीव निधी मिळावा, यासाठी वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी तातडीने वाढीव निधी देणार असल्याचे आश्वासन दिले.
मुंबई येथे संगमनेर वकील असोसीएशनच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. सुहास आहेर, माजी अध्यक्ष ऍड. त्रिंबक गडाख, जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे आदी उपस्थित होते. संगमनेरात दोन जिल्हा न्यायाधीश, एक दिवाणी न्यायाधीश, एक वरिष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व कनिष्ठस्तर न्यायाधीशांची न्यायालये आहेत. सध्याच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून, दिवसेंदिवस ती वाढत आहे. संगमनेर व अकोले तालुक्यांचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्यामुळे येथे औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालयासह चार न्यायालये होण्याची शक्यता आहे. ही सर्व न्यायालये एकाच ठिकाणी सुरू होण्यासाठी आ. थोरात यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात राज्य सरकारकडून निधी मंजूर केला होता. त्यामुळे घुलेवाडी फाटा येथे नवीन प्रशस्त इमारत उभी राहिली आहे.
या नवीन इमारतीअंतर्गत मुख्य जोड रस्ता व अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, संरक्षक भिंत, लोखंडी गेट, जमीन सपाटीकरण, वाहनतळ जनित्र सुविधा, परिसराचे सुशोभीकरण व न्यायालयीन कक्षांचे अंतर्गत फर्निचर या बाबींचा समावेश आहे. यातील उर्वरित कामांसाठी आज आ. थोरात व वकील असोसिएशनच्या वतीने अर्थमंत्र्यांकडे वाढीव निधीची मागणी करण्यात आली. यावर ना. मुनगंटीवार यांनी संबंधित विभागांना तातडीने संगमनेर न्यायालयासाठी 16 कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना केल्या. यामुळे एकूण 16 न्यायालये एकाच ठिकाणी सुरु होण्याबरोबरच पक्षकारांचे, वकिलांचे व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरळीत होणार आहे.