सिंहगड रस्ता – सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने रविवारी सकाळापासून सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. एकतानगरमधील स्काय रेसिडेन्सी, साई सिद्धी जलपूजन, शारदा सरोवर, द्वारका सोसायटी, आनंद पार्क या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले होते. खबरदारी म्हणून या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यात आले आहे.
पार्किंगमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने पाण्याखाली गेली आहेत; तर तळमजल्यावर राहणाऱ्यांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने या सर्व सोसायटीमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. एकतानगरमधील सुमारे 5 हजाराहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला.
नगरसेवक श्रीकांत जगताप आणि नगरसेविका मंजुश्री नागपूरे, दीपक नागपुरे व शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे तसेच कार्यकर्त्यांनी पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करत त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पावसाचा जोर वाढला तर धरणातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेऊन या परिसरात आपतकालीन व्यवस्था सज्ज करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.