ढेबेवाडी – मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी, साबळेवाडी, मदनेवस्ती, कदमआवाड या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावावा, अशी मागणी विभागातील नागरिकांमधून केली जात आहे.
या विभागात बिबट्याचा संचार वाढला मानवी वस्तीकडे वाढला असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी भरदुपारच्या वेळेत मंद्रुळकोळे खुर्द येथील वांग नदीशेजारील उसाच्या शेताच्या बांधावर बिबट्या उभा होता. यावेळी शेतमालक शशिकांत मोरे शेतात जात असताना शेताच्या बांधावरून त्याने उडी मारून धूम ठोकली.
जंगलात वावरणारा बिबट्या आता घराकडे वळल्याने लोक संध्याकाळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. तर बिबट्याच्या शिवारातील वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. यासाठी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात सापळा लावावा, अशीही मागणी होत आहे.
ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळेसह जानुगडेवाडी, साबळेवाडी परिसरातील लोकांना हा बिबट्या वारंवार दिसत आहे. त्याने आजपर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. काही वेळा जनावरांच्या गोठ्यात शिरून शेळ्या गायब केल्या आहेत. कदाचित तो माणसावरही हल्ला करू शकेल, यासाठी वनविभागाने गांभीर्याने दखल घेवून त्याचा बंदोबस्त करावा.
शशिकांत मोरे , साबळेवाडी