पुणे – राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैज्ञानिक अधिकाऱ्यावर शाई फेकण्यात आली होती, या घटनेचा राज्यातील मंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध केला. याबाबत निषेध करण्यासाठी मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळी पट्टी बांधून काम केले. पुणे विभागीय कार्यालयाकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयात काम करणारे वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते हे राज्याच्या जैवकचरा प्रकल्पाचे प्रमुख आहेत. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी डॉ. सुपाते यांनी एका कंपनीविरोधात बंदीचा आदेश दिला होता.
यासंदर्भात खटलादेखील सुरू आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिक नगरसेविका रूख्साना सिद्दीकी यांच्यासहित चर्चेसाठी आलेल्या जमावाकडून चर्चेदरम्यान डॉ. सुपाते यांच्यावर शाई फेकण्यात आली. यासंदर्भात मंदळाने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधितांना अटक करण्यात आली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या हा हल्ला निंदास्पद असल्याचे मत व्यक्त करत, मंडळाच्या सर्व विभागगय कार्यलयांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.