प्रवेश रद्द करताना फक्‍त 200 रुपयेच घ्या

अकरावी प्रवेश : उर्वरित संपूर्ण फी विद्यार्थ्यांना परत करणे आवश्‍यक

महाविद्यालयातूनच साहित्य खरेदीची सक्ती नको

कॉलेज फी व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. विद्यार्थी व पालकांना कॉलेजची माहिती पुस्तिका, जर्नल, प्रयोगशाळेसंबंधी साहित्य, गणवेश, शैक्षणिक साहित्य आदी साहित्य महाविद्यालयातूनच खरेदीची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत.

कागदपत्रे तत्काळ परत करा

प्रवेश रद्द करतेवेळी विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून जास्त कपात करू नये. दहावीचा मूळ शाळा सोडल्याचा दाखला व मूळ गुणपत्रक विद्यार्थ्यांना तत्काळ द्यावे. त्याची पोहोचही घ्यावी. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची जनरल रजिस्टरमध्ये नोंद आवश्‍यक आहे. कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, याची दक्षता घेण्यात यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश रद्द करताना प्राचार्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. प्रवेश रद्द करताना केवळ 200 रुपये शुल्क कमी करुन उर्वरित संपूर्ण फी विद्यार्थ्यांना परत करणे आवश्‍यक आहे.

चालू शैक्षणिक वर्षातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे विभागात 296 महाविद्यालयात 1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 63 हजार 566 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. प्रवेशासाठी पहिली व दुसरी फेरी पूर्ण करण्यात आली आहे. या फेऱ्याअंतर्गत प्रवेश मिंळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन संपूर्ण फी भरुन प्रवेश निश्‍चित केले आहेत.

मात्र, काही विद्यार्थ्यांनी सोयीचे महाविद्यालय न मिळाल्यामुळे तसेच पॉलिटेक्‍निक, आयटीआयसह इतर कोर्सेसला प्रवेश घेतले आहेत. काही विद्यार्थी परगावी शिक्षणासाठी जात आहेत. या विद्यार्थ्यांकडून प्रवेश रद्द करण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. महाविद्यालयांकडून सहजासहजी प्रवेश रद्द केले जात नसल्याची बाब विद्यार्थी, पालकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याची दखल घेऊन उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना नुकतेच थेट नियमावलीचे पत्रच शिक्षण उपसंचालक विभागाने पाठविले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)