पुणे – मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. या पथकांमध्ये ड्रेनेज, विद्युत तसेच पथ विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून वारंवार पाणी साठणाऱ्या ठिकाणीही पथ विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली.
गेल्या काही तासांत झालेल्या जोरदार पावसाने पाणी साठण्यासह, नाले तुंबल्याचे प्रकारही घडले. या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असल्याने शनिवार तसेच रविवारी सुट्टी असली, तरी आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे 20 ते 25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या-ज्या भागातून तक्रारी आल्या, तेथील क्षेत्रीय कार्यालयांना ही माहिती देऊन तातडीने घटनास्थळी मनुष्यबळ पाठवित मदतकार्य सुरू केल्याचे सोनुने यांनी स्पष्ट केले.