नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनियाचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र ते अयशस्वी ठरले. माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.