मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेस, डेक्‍कन क्‍वीन आज रद्द

पुणे  – मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. पुणे ते मुंबई धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही मार्ग वळविण्यात आले आहेत.
शनिवारी पुणे-मुंबईच्या गाड्यांबरोबरच दक्षिण भारतातून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

अनेक गाड्या पुणे आणि दौंड स्थानकापर्यंत धावल्या. तर, काही पुण्यातच थांबविण्यात आल्या. त्यातील काही गाड्यांचा परतीचा प्रवास देखील पुण्यातूनच झाला. पुणे ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांची “डेक्कन क्वीन’ आणि मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेस दि. 28 रोजी रद्द करण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्गावरील पाऊस आणि देखभाल-दुरुस्तीचे काम यामुळे डेक्कन क्वीन रविवारी धावणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.

दि. 27 रोजी पुणे ते मुंबईमार्गे धावणाऱ्या एर्नाकुलम ते पुणे एक्‍स्प्रेस पनवेलपर्यंत, पंढरपूर ते मुंबई फास्ट पॅसेंजर पुण्यापर्यंत, विशाखापट्टणम ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी पुण्यापर्यंत, अहमदाबाद -पुणे(दुरांतो एक्‍स्प्रेस) पनवेलपर्यंत, इंदौर-पुणे एक्‍स्प्रेस पनवेलपर्यंत धावल्या.

महामार्ग सुरळीत
शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. तर, पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले. चिपळूण भागात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने काही प्रमाणात त्याचा ताण वाढला होता. दरम्यान, पावसाच्या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना रजा, सुट्टी न देता कामावर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते, असेही मोहिते यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)