पिंपरी – एका बारा वर्षीय विद्यार्थिनीने मार्क कमी पडल्यामुळे शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी त्रिवणीनगर येथील खासगी शाळेत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थिनी त्रिवेणीनगर येथील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकते.
सोमवारी शाळेचा “ओपन डे’ होता. या दिवशी पालकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी माहिती दिली जाते. तिला मागील परीक्षेत कमी मार्क मिळाले, याची माहिती शिक्षकांनी सर्वांसमोर तिच्या पालकांना दिली. मार्क कमी पडलेले सर्वांसमोर सांगितल्याने ती उदास झाली. “ओपन डे’ च्या कार्यक्रमानंतर विद्यार्थिनीची आई शाळेच्या इमारतीच्या खाली थांबली होती. त्या वेळी तिने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.