पाण्यासाठी खर्च होताहेत वर्षाला ४० लाख

वाकड, पिंपळे सौदागर येथील सोसायट्यांना रोज विकत घ्यावे लागते पाणी

पिंपरी – शहरात सध्या सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे वाकड आणि पिंपळेसौदागर भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये टॅंकरच्या खेपा वाढल्या आहेत. मोठ्या सोसायट्यांना दररोज 13 ते 15 टॅंकर पाणी मागवावे लागत आहे. ऐन पावसाळ्यातही सोसायट्यांची तहान टॅंकरनेच भागविली जात आहे.

टॅंकरच्या अतिरिक्‍त खर्चामुळे या उच्चभ्रू परिसरातील सोसायट्यांचे बजेट बिघडू लागले आहे. टॅंकरवरच सोसायट्यांचे सरासरी वर्षाला सुमारे 37 ते 40 लाख रुपये खर्च होत आहेत. महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने सोसायटीतील रहिवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.

शहरामध्ये सध्या दिवसाआड 420 ते 430 दशलक्ष लिटर इतके पाणी पुरविले जात आहे. पाणी कपात लागू नसताना दररोज 460 दशलक्ष लिटर इतके पाणी देण्यात येत होते. शहराला 2018 पर्यंत 428 दशलक्ष लिटर इतके पाणी पुरत होते. मात्र, सध्या नागरीकरणाचा वेग वाढला आहे. त्याच बरोबरीने लोकसंख्या देखील झपाट्याने वाढते आहे.

हा वेग पाहता 2021 पर्यंत शहराची लोकसंख्या 30 लाखापर्यंत पोहचण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत पाण्याची मागणी देखील वाढणे साहजिक आहे. शहराला 2021 मध्ये दररोज 479 दशलक्ष लिटर इतके पाणी लागेल, असा अंदाज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्तविलेला आहे.

या परिसरात पाण्याची गरज जास्त  वाकड आणि पिंपळे सौदागर हा परिसर झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या खूप मोठी आहे. येथील मोठ्या सोसायट्यांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दररोज सरासरी एक ते दीड लाख लिटर इतके अतिरिक्त पाणी लागते. त्यासाठी दिवसभरात 13 ते 15 टॅंकर मागवावे लागतात.

एका टॅंकरमध्ये सरासरी 10 हजार लिटर पाणी येते. सोसायट्यांच्या मागणीनुसार दिवसभरात मागविण्यात येणाऱ्या टॅंकरचे प्रमाण कमी-जास्त असते. प्रति टॅंकर 800 ते एक हजार रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार विचार केला असता संबंधित सोसायटीला दिवसाला सरासरी साडेदहा हजार रुपये खर्च लागतो. तर, वर्षाला तब्बल 37 ते 40 लाख रुपये मोजावे लागतात. एका सोसायटीमध्ये 900 सदनिका असल्यास प्रत्येक सदनिकाधारकास वार्षिक चार ते साडेचार हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे.

वाकड परिसरात सध्या दररोज 9 दशलक्ष लिटर इतके पाणी दिले जात आहे. परिसरासाठी 13 ते 14 दशलक्ष लिटर पाणी देण्याची प्रत्यक्ष गरज आहे. येथील सोसायट्यांमध्ये दररोज 13 ते 15 टॅंकर इतके पाणी मागवावे लागत आहे. वाकड येथील पाण्याच्या टाकीचे भूमीपुजन झाले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत आहे. वाकड भागातुन महापालिकेला कररूपाने मोठे उत्पन्न मिळते. त्या तुलनेत सोसायटीधारकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशीच परिस्थिती पिंपळे सौदागर भागातही आहे.

– सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन.

शहरात सध्या पाणी कपात सुरू आहे. त्यामुळे सोसायट्यांना देखील कमी पाणी मिळत आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर येथील प्रत्येकी 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. अमृत योजनेतंर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. सोसायटीधारकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुन:वापर सुरू केल्यास त्यांना वापरासाठी आवश्‍यक पाण्याची गरज भागेल.

– मकरंद निकम, सह-शहर अभियंता (पाणीपुरवठा), महापालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)