सोलापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यंदाच्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली.
11 हजार रुपये रोख, स्वर्गीय जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांच्या हस्ते आणि मसाप पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.
या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि स्व. दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि सायली जोशी हे करणार आहेत. यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अनिल अवचट, प्रा. मिलिंद जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना देण्यात आलेला आहे.