पुणे / खडकवासला – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण सोमवारी निम्मे भरले. खडकवासला धरणात 61.51 टक्के म्हणजे 1.21 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांत एकूण 8.07 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा जवळपास 6 महिन्यांचा प्रश्न मिटला आहे.
खडकवासला धरणसाखळीत मागील 15 दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने रविवारी 24 तासांतच प्रकल्पात सुमारे सव्वा टीएमसी पाणी जमा झाले. सोमवारीदेखील धरणपरिसरात पावसाची संततधार असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ओढे-नाले यांद्वारे धरणात पाणी जमा होत आहे. सोमवारी दिवसभरात खडकवासला धरणात 42 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर पानशेत-85 मिमी, वरसगाव-98 मिमी आणि टेमघरमध्ये 100 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.