पालिकेची तयारी : 555 मोबाइल टॉयलेट
“स्वच्छ वारी’वर यंदाही प्रशासन देणार भर
पुणे – पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. यानिमित्त महापालिकेनेही विशेष नियोजन केले आहे. वारी काळात यंदाही स्वच्छतेवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तर, पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरेही पालखीसाठी सजली आहेत.
यात महापालिकेची सर्व सुलभ स्वच्छतागृहे मोफत ठेवण्यासह, शहरात पालखी मार्ग तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे 555 मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालखी मुक्कामासाठी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन तसेच शहर स्वच्छतेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे पुण्यात दि.26 जून रोजी आगमन होत आहे. दि.27 रोजी त्यांचा मुक्काम असून, दि.28 जूनला पहाटे दोन्ही पालख्या पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवतील. त्या अनुषंगाने महापालिकेकडून याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी मंगळवारी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत कुसमाडे कॉलनी येथे, तर दुपारी 3 वाजता संत तुकाराम महाराज पालखीचे पाटील इस्टेट येथे महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत स्वागत केले जाणार आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज
घनकचरा विभागाकडून पालखीच्या कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन शिफ्टमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज उतरविणार येणार आहे. पालखी सोहळा पुण्यात आल्यापासून तो शहराबाहेर जाईपर्यंत सतत स्वच्छता केली जाणार आहे. दोन्ही पालख्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मुक्कामी असतात. त्यासाठी या भागासाठी अतिरिक्त 140 कर्मचारी स्वच्छतेसाठी दिले आहेत. 300 स्वच्छतागृहे मोफत असून स्वच्छतेसाठी 100 कर्मचारी वारीसोबत जाणार आहेत.
अग्निशमन दलाच्या सुट्ट्या रद्द
पालखी काळात सुरक्षेसाठी अग्निशमदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांमध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तेथे अग्निरोधक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुलेनगर तसेच वाकडेवाडी येथे नदीपात्रात वारकरी आंघोळीसाठी जात असल्याने तेथे जीव रक्षक पथक तैनात करण्यात आले असून पंढरपूरपर्यंत एक अग्निशमनगाडी तसेच पथक असणार आहे.
रुग्णालये 24 तास सुरू
पालखी मुक्काम असलेल्या परिसरातील महापालिकेची रुग्णालये 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत. फिरत्या रुग्णालयातून मोफत आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे. पालखी शहरात प्रवेश करताना तसेच हद्दीबाहेर जाताना महापालिकेचे फिरते वैद्यकीय पथकही पालखीत राहणार असून आरोग्य विभागाचे 1 पथकही पुणे ते पंढरपूर मार्गात सोबत असेल.
पाणीपुरवठाही अखंड
पालखी सोहळयासाठी बुधवारी आणि गुरूवारी 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सुमारे 100 ठिकाणी सार्वजनिक नळकोंडाळी उभारण्यात आली असून पालखी मुक्कामाच्या भागातील महापालिकेच्या इमारतींची नळदुरूस्ती तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही ठिकाणी पाण्याचे टॅंकरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.