खटाव तालुक्‍याच्या शिक्षण विभागातही दुष्काळ 

प्रकाश राजेघाटगे

गटशिक्षणाधिकाऱ्यापासून शिपायापर्यंतची अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्तच

न्याय कधी मिळणार ?

महात्मा फुलेंची जन्मभूमी असलेल्या खटाव तालुक्‍याला शासन न्याय कधी देणार याकडे खटाव तालुक्‍यातील समाजाचे व शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांचे लक्ष लागून राहिले आहे. खटाव तालुक्‍यातील शिक्षण विभागातील अनेक पदे सहा वर्षांपासून रिक्त आहेत. तरीही आमदार व खासदार गप्प का आहेत? असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यात खटावचे आमदार व खासदार कायम आघाडीवर असतात. मग खटाव तालुक्‍यातील शिक्षण विभागातील रिक्त जागांचा प्रश्‍न लोकहिताचा व गरजेचा गंभीर असून आमदार व खासदार गप्प का? या विषयी जनतेत कुतूहल आहे.

बुध – खटाव तालुक्‍यात ज्याप्रमाणे पाण्याचा दुष्काळ आहे. त्याचप्रमाणे येथील शिक्षण विभागातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पाच ते सहा वर्षांहून अधिक कालावधी लोटला असतानाही ही पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरच शिक्षण विभागाचा गाडा सुरू आहे.

खटाव तालुक्‍यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेली चार वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, लिपीक, शिपाई, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक अशी अनेक पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. यावर्षी मे अखेर अनेकजन सेवानिवृत्त झाल्याने खटावच्या शिक्षण विभागातील रिक्तपदांची संख्या अधिक वाढणार आहे. अशा कठीण परिस्थितीत सध्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे व केंद्रप्रमुख हे अपुरे मनुष्यबळ असतानाही कल्पकता व नियोजन करुन मुख्याध्यापक व शिक्षकांना विश्‍वासात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे विविध उपक्रम व शासन धोरण यशस्वीपणे राबवत आहेत.

खटाव तालुक्‍यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पद सन 2014 पासून रिक्त आहे. शिक्षण विस्तार अधिकारी सहा पदे मंजुर असुन दोनच पदावर शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एकाकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. एकच शिक्षण विस्तार अधिकारी तालुक्‍याचे कामकाज पहात आहेत. चार शिक्षण विस्तार अधिकारी यांचे बीट गेली सहा वर्षापासून रिक्त आहेत. खटाव पंचायत समिती शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार अधीक्षक पद सन 2014 पासून सहा वर्ष झाले रिक्त आहे. सर्व शिक्षा अभियान विभागातील लेखाधिकारी पद सन 2014 पासून सहा वर्ष झाले तरी रिक्त आहे. शिक्षण विभागाला दोन वरिष्ठ लिपीक पदे मंजुर आहेत पण ती पदेही रिक्त आहेत. कनिष्ठ लिपीक दोन कार्यरत असून त्यांना दोन वरिष्ठ लिपीकाचे अतिरिक्त कार्यभारासह सुमारे आठशे शिक्षकांची आस्थापना व कार्यालयीन पत्रव्यवहार, कामकाज, सेवापुस्तके, विविध कामे करावी लागत आहेत. शिपाई यांची पदेही रिक्त आहेत.

खटाव तालुक्‍यातील शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांची 21 पदे मंजूर आहेत. पण त्यापेकी 13 पदे रिक्त आहेत. सध्या आठ केंद्रप्रमुख कार्यरत असून त्यापैकी दोन दिव्यांग आहेत. तीन महिला आहेत. तीन-तीन केंद्राचा अतिरिक्त कार्यभार केंद्रप्रमुखांना संभाळावा लागत आहे. तरीही अशा परिस्थिती शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी सध्याचे कार्यरत केंद्रप्रमुख अधिकचा वेळे देऊन नियोजनबध्द पध्दतीने, तंत्रज्ञानाचा वापर करुन व मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचाय, स्थानिक पदाधिकारी यांना विश्‍वासात घेऊन विविध शैक्षणिक ऊपक्रम व प्रकल्प यशस्वीपणे तालुक्‍यात राबवत आहेत.

शाळा पातळीवरही मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक यांची अनेक पदे पाच वर्षांपासून रिक्त आहेत. रिक्त पदे असुनही मुख्याध्यापक व शिक्षक समाजाचे सहकार्य घेत आहेत. डिजीटल क्‍लासरुम, ई-लर्निग, बहुवर्ग अध्यापन पध्दती, जोडवर्ग पध्दती, कृतियुक्त व आनंददायी अध्यापन पध्दती, ज्ञानरचनावाद या विविध तंत्रज्ञानाचा व समाजसहभाग याचा वापर करुन खटाव तालुका शैक्षणिक गुणवत्तापुर्ण दर्जेदार व आनंददायी शिक्षण देण्यात आघाडीवर आहे. आता गरज आहे शासनाने खटाव तालुक्‍यातील सहावर्षापासून रिक्त असलेली शिक्षण विभागातील पदे भरण्याची. खटाव तालुक्‍यातील शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे अतिरिक्त कामाचा बोजा कार्यरत असलेल्या अधिकारी व केंद्रप्रमुख, शिक्षकांवर पडत आहे. त्यांना सुट्टीच्या दिवशीही जादा वेळ देऊन कामकाज करावे लागत आहे. हक्काच्या असणाऱ्या रजासुध्दा घेता येत नाहीत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here