आराखडा बनवण्यासाठी लवकरच घेणार बैठक ; विधानसभेत निधीसाठी पाठपूरावा करणार
सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी साकारण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले सरसावले आहेत. गुरुवारी शिवेंद्रराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत किल्यावरील राजसदरेसह इतर इमारतींची पाहणी केली. अजिंक्यतारा किल्ल्यावर प्रस्तावित शिवसृष्टीमुळे पर्यटनाला चालना मिळून ऐतिहासिक शाहूनगरीचे नाव देशभरात पोहचेल असा विश्वास शिवेंद्रराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शिवसृष्टी प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्येष्ठ इतिहासतज्ञ व ऐतिहासिक बांधकामांची जाण असणाऱ्या वास्तुविशारदांची लवकरच बैठक घेऊन त्यांचे मार्गदर्शन मागवले जाणार आहे असे स्पष्ट करून शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या निधीसंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असून जिल्हा नियोजन समितीकडेही लेखी पत्राद्वारे सूचना दिली जाईल.
याशिवाय शिवसृष्टीच्या उभारणीसाठी दानशूर सातारकर मंडळीनी पुढे यावे असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी करून या मागणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पंचायत समितीचा बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा करून शिवेंद्रराजे यांनी किल्ल्यावरील राजसदरेची पाहणी केली. शिवकालातील किल्ल्यावरील जुनी दारूकोठारे, खलबतखाने चौसेपी वाडे यांची दुरुस्ती तसेच शिवकाळातील निवडक प्रसंगांची आर्ट गॅलरी, म्यूरल्स, आकर्षक प्रकाश योजना सचित्र संदर्भ यांचा समावेश आर्ट गॅलरीमध्ये असेल त्याचा आराखडा तज्ञांच्या चर्चेअंती निश्चित करून मगच शिवसृष्टीचे एकूण बजेट निश्चित केले जाईल असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
शाहूनगरी हे नाव साताऱ्याचे असले छत्रपती शाहू महाराजांचे कोणतेही स्मारक येथे नाही. शिवसृष्टी आकाराला आल्यास सातारा शहराच्या पर्यटनाला चालना मिळून ऐतिहासिक नगरीचे नाव देशपातळीवर पोहचेल असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. अजिंक्यतारा किल्ल्याकडे येणाऱ्या रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण, पथदिव्यांची सोय, वृक्षारोपन तसेच अन्य सुविधा देण्यासंदर्भात शिवेंद्रराजे यांनी बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याशी चर्चा करून आराखडा बनविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
सातारा पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला नगर विकास आघाडीने आरक्षणाच्या मुद्यावर विरोध केला होता. त्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधाची कोल्हेकुई करणाऱ्यांना आरक्षण उठवून विरोधकांना चपराक दिल्याची टीका केली होती. त्याविषयी प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले त्यांनी टाऊन हॉलचे आरक्षण उठवले की नाही याची मला माहिती नाही. मात्र तत्कालीन परिस्थितीत त्या जागेवर आरक्षण होते. पालिकेत सातारकरांचा पैसा येतो जर काही चुकीचं घडत असेल तर त्याला नगर विकास आघाडी विरोध करणारच. जर सातारकरांच्या सोयीसाठी काही चांगले घडत असेल तर आमची काहीच हरकत नाही.