पुणे – फुलांचा मुकूट… विविधरंग पुष्प रंगावलीने सजाविलेला परिसर… बाप्पाचा आकर्षक हार… अलंकार आणि फुलांनी सजलेले बाप्पाचे रुप… असे शारदा गजानन मंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. हे मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
तगराच्या फुलांनी बनविलेला शारदा-गजाननाचा मुकूट, मोगरा आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा हार, मोगरा, जुई, लिली, चाफा अशा विविध फुलांनी सजलेल्या शारदा-गजानन मंदिरात वासंतिक पुष्पोत्सव दिमाखात साजरा झाला. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विश्वास भोर, दादा मोरे, नारायण चांदणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये दीड महिना वासंतिक उटीभजनाचे आयोजन केले जाते. याची सांगता या मंदिरामध्ये होते.
मंदिरात मोगरा, जुई, लिली, निशीगंध, झेंडू, लाल कार्नेशियन, चाफा, जर्बेरा, गुलाब अशा 350 किलो वासंतिक पुष्पांची आकर्षक आरास करण्यात आली होती. तर शारदा-गजाननाच्या मूर्तीला फुलांची आभूषणे देखील करण्यात आली होती, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष थोरात यांनी दिले. यावेळी विविधरंगी फुलांची आकर्षक पुष्प रांगोळी साकारली होती. राजू नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आरास केली होती. माऊली टाकळकर आणि हरिहर भजनी मंडळाच्या भजनसंध्येच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.