वानवडी – भर उन्हात कात्रज घाट ते रायगड किल्ला असा 81.6 कि.मी.चा मॅरेथॉन ट्रेल रन न थांबता 26 तास 45 मिनिटांमध्ये यशस्वीरीत्या गणेश तानाजी भिंताडे यांनी पूर्ण केला आहे. कात्रज घाट येथून सुरुवात केल्यानंतर सिंहगड किल्ला – विंझर – वेल्हे – जाधववाडी – वरोती – सिंगापूर – सिंगापूरची नाळ – दापोली – वाघेरी – रायगडवाडी – रायगड किला असा मार्गक्रम होता.
या विषयीचे अनुभव सांगताना गणेश भिंताडे म्हणाला, लोणावळा ते भीमाशंकर आणि नानेघाट ते भीमाशंकर असे दोन ट्रेल रन मी अगोदरच केले होते. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अचूक सल्ले आम्हाला असे अवघड ट्रेल रन करताना पावलोपावली मदत करतात. तुमचे जर नियोजन अचूक असेल तर तुम्हाला हमखास यश मिळणारच हे ब्रीद वाक्य लक्षात ठेऊनच आम्ही कात्रज घाट ते रायगड किल्ला या लांब पल्ल्याच्या ट्रेल रनचे नियोजन केले. दि.22 मार्च 2019 रोजी मी कात्रज घाटामधून सायंकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी या ट्रेल रनला सुरुवात केली. माझी नियोजनबद्ध तयारी झाली होती. त्यामुळे मी हा ट्रेक पूर्ण करेनच असा दृढ आत्मविश्वास मनामध्ये होता.
कात्रज घाट ते सिंहगड किल्ला, सिंहगड किल्ला ते विंझर, विंझर ते वेल्हा, वेल्हा ते सिंगापूर, सिंगापूर ते वाघेरी, वाघेरी ते रायगड किल्ला हे टप्पे आव्हानात्मक होते. त्यातील पहिला टप्पा कात्रज घाट ते सिंहगड किल्ला, सिंहगड किल्ला ते विंझर या टप्प्यामध्ये मला जवळपास 20 ते 22 डोंगर चढ-उतार करावे लागले आणि वाघेरी ते रायगड किल्ला या टप्प्यामध्ये जवळपास 2400 ते 2500 फुट एवढी चढाई करावी लागली. संपूर्ण ट्रेकमध्ये प्रत्येक टप्प्यावरील गावांमधील स्थानिक लोकांची आम्हाला खूप मदत झाली. त्यांचे प्रेम पाहून आम्हाला भारावून येत होते आणि सगळ्यांनाही आमच्या मोहिमेचे कौतुक केले. अशा प्रकारे हा कात्रज घाट ते रायगड किल्ला हा ट्रेक पूर्ण केला. याआधी आम्ही सिंहगड-राजगड-तोरणा असा दोनवेळा ट्रेक केला होता. अशाप्रकारे गणेश भिंताडे आतापर्यंत एकूण 52 वेगवेगळे ट्रेक पूर्ण केले आहेत. त्यातील आलंग-मदन-कुलंग (एक दिवस), लोणावळा-भीमाशंकर (एक दिवस), नानेघाट ते भीमाशंकर (एक दिवस), सिंहगड -राजगड-तोरणा (एक दिवस), लिंगाणा, ड्यूक्स नोज रॅपलिंग असे अवघड ट्रेक आत्तापर्यंत पूर्ण केले आहेत. आणि यापुढेही सह्याद्रीमधील जास्तीत जास्त ट्रेक पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे, भिंताडे याने सांगितले. अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार करण्यात आली आहे. विशाल ठोंबरे, गणेश भिंताडे हे देखील मोहीमेत सहभागी झाले होते.