शिरूर तहसीलसमोर राष्ट्रवादीचे उपोषण सुरू
शिरूर – तालुक्यातील घोड धरणातील पाणी कमी होत चालले आहे. रांजणगाव गणपती एमआयडीसीचा एक्स्प्रेस फिडर 24 तास पाणी उपसा औद्योगिक कारणांकरीता करीत आहे. पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक कारणासाठीचे पाणी बंद करावे, हे पाणी पिण्यासाठी व जनावरांसाठी द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार अशोक पवार यांनी आजपासून शिरूर तहसील कार्यालयासमोर उपोषणाचे अस्त्र उगारले आहे.
पवार म्हणाले की, जलसंपदा विभागाने पाणी वाटपाचे प्राधान्यक्रम ठरविले आहे. पाणी वापराचा सुधारित प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहे. पशुधनासह पिण्यासाठी पाणी तसेच शीतकरण आरोग्य आणि स्वच्छताविषयक गरजा यासाठी घरगुती वापर आहे. कृषी सिंचनाकरीता (पाणी वापर), औद्योगिक, वाणिज्यिक वापर व कृषी उत्पादनावर आधारित उद्योगासाठी वापर, पर्यावरण व करमणूक यासाठी वापर, व इतर सर्व प्रकारच्या वापरासाठी, असे प्राधान्यक्रम आहेत.
मागील काही वर्षांत जून महिन्यामध्ये शिरूर तालुक्यात पाउस पडला नाही. शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने पाणी देण्यात यावे व बाकीचे तास कमी करण्यात यावे. एमआयडीसीसाठी पाइपलाइनद्वारे प्रती तास किती गॅलन पाणी मिळते. त्या पाण्याचा वापर किती लोकसंख्येसाठी व किती जनावरांसाठी करीत आहे. याचीही माहिती मागवली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती विश्वास कोहोकडे, बाबासाहेब फराटे, जिल्हा परिषदेचा कृषि समितीच्या सभापती सुजाता पवार, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, शहराध्यक्ष नगरसेवक मुझ्झ्फर कुरेशी, बिजवंत शिंदे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. किरण आंबेकर, रंजन झांबरे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.