बीजिंग -अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी चीनने ट्रॅव्हल ऍलर्ट जारी केला आहे. अमेरिकेत छळवणूक होऊ शकते, असा इशारा चीनने नागरिकांना दिला आहे. व्यापार युद्धामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. त्यापार्श्वभूमीवर, चीनने उचललेले पाऊल असाधारण स्वरूपाचे मानले जात आहे.
अमेरिकेला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सावध करणारी सूचना चीनने सोमवारी जारी केली होती. त्यापाठोपाठ चीनने नागरिकांसाठी ट्रॅव्हल ऍलर्ट जारी केला. त्या पाऊलाचा फटका अमेरिकेच्या वाहतूक उद्योगाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनने नागरिकांना अमेरिकेत छळवणूक होण्याचा इशारा देतानाच त्यांच्या सुरक्षेविषयीचे मुद्देही उपस्थित केले आहेत.
अमेरिकेत गोळीबार, चोऱ्या या घटना वारंवार होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी अमेरिकेला जाणाऱ्या चीनी पर्यटकांच्या संख्येने 15 वर्षांतील नीचांक गाठला. अलिकडच्या काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखीच ताणले गेले आहेत. अमेरिकेने एका चीनी दूरसंचार कंपनीवर घातलेले व्यापारविषयक निर्बंध त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. आता चीनने नागरिकांसाठी जारी केलेल्या ट्रॅव्हल ऍलर्टमुळे अमेरिका भडकण्याची शक्यता आहे.