माहिती तंत्रज्ञान, नैसर्गिक वायू कंपन्यांना विक्रीची झळ
मुंबई – शेअरबाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे सावध गुंतवणूकदारांनी मंगळवारी नफेखोरी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184 अंकांनी म्हणजे 0.46 टक्क्यांनी कमी होऊन 40,083 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 66 अंकांनी कमी होऊन 12,021 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील 17 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 13 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 1.63 टक्क्यांनी, तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 1.5 टक्क्यांनी, आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 0.99 टक्क्यांनी तर तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 0.84 टक्क्यांनी कमी झाला. विश्लेषकांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे त्यामुळे काल बरीच खरेदी झाली होती. मात्र निर्देशांकात यापेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता कमी असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी आज नफेखोरी केली. बुधवारी धार्मिक कारणामुळे शेअरबाजारांना सुट्टी राहणार आहे.
सॅंक्टम मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील शर्मा यांनी सांगितले की आता निर्देशांकांची पुढील वाटचाल ही रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाच्या आधारावर राहील.