एव्हरेस्टसारख्या अतिउंचीवरील शिखर मोहिमांसाठी मिळणार मोफत मार्गदर्शन
पुणे – माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर आपणही एकदा पोहचावे व आपल्या देशाचा झेंडा अभिमानाने फडकवावा, असे जगातील हजारो गिर्यारोहकांना वाटते. सुरक्षित गिर्यारोहण ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (जि.जि.आय.एम.) तर्फे अतिउंचीवरील हिमालयीन शिखर मोहिमांसाठी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. एव्हरेस्टसारख्या अतिउंचीवरील शिखर मोहिमांसाठी करण्यात येणारे हे मार्गदर्शन मोफत उपलब्ध असेल.
जि.जि.आय.एमतर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे विवेक शिवदे यांनी या मार्गदर्शन केंद्राबाबत माहिती दिली. शिवदे म्हणाले, “हिमालयीन शिखरांवर चढाई करताना हिमप्रपात, रॉकफॉल, हिमवादळे, खराब हवामान यांसारख्या नैसर्गिक संकटांसोबतच अतिउंचीवर होणारे आजार, डिहायड्रेशन, थकवा यांसारख्या आजारांचा देखील सामना गिर्यारोहकाला करावा लागतो. अशा परिस्थितीत चढाईपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गिर्यारोहक सक्षमपणे या संकटांचा सामना करू शकतील असे आम्हाला वाटते. त्यामुळेच हे मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू करत आहोत. जास्तीत जास्त गिर्यारोहक याचा लाभ घेऊन सुरक्षित गिर्यारोहणाचा आनंद घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’
नुकत्याच पार पडलेल्या चढाई मोसमामध्ये माउंट एव्हरेस्ट व इतर शिखरांवरील चढाई-उतराईवेळी सुमारे 11 गिर्यारोहाकांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक संख्या ही भारतीय गिर्यारोहकांची होती. याबद्दल जगभरामध्ये बरीच चर्चा झाली. या सर्व घटनाक्रमांनंतर सर्व गिर्यारोहण जगताने सुरक्षित गिर्यारोहणावर प्राधान्य दिले पाहिजे व सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे वाटल्यानेच हिमालयीन शिखर मोहिमांसाठी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात येत असल्याचे शिवदे यांनी सांगितले.
मार्गदर्शनाचे स्वरूप
हिमालययीन शिखरावर चढाईसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांना संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा फोनद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. लवकरच यासंदर्भात संकेथस्थळ विकसित करून ऑनलाइन स्वरूपातही मार्गदर्शानाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यामध्ये गिर्यारोहणाविषयक आवश्यक माहिती, गिर्यारोहण साहित्य आणि ते मिळण्याचे ठिकाण, आवश्यक प्रशिक्षक आणि ते कुठे मिळेल याबाबत माहिती आणि प्रत्यक्ष मोहिमेच्या वेळी कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करावे यासंदर्भातील माहितीचा समावेश असणार आहे, असे विवेक शिवदे यांनी सांगितले.