हसन चाचा मूळचे लातूरचे पाच हजार दिव्यांगांना केले प्रशिक्षित
हडपसर – एखादा अवयव नसेल तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमावणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी आपला एक हात यंत्रात गमावलेले हसन चाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात गमावण्याची वेळ आलेल्या अनेकांना लढण्याचे बळ देण्याचे काम ते करीत आहेत. अशा व्यक्तींसाठी एलन मिडोज कृत्रिम हात फाउंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या हाताला प्रशिक्षण देण्याचे काम चाचा मोफत करीत आहेत. आजपर्यंत देशातील सुमारे पाच हजार हात गमावलेल्या दिव्यांगांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे.
हसन कासिम शेख (वय 60) हे मूळचे लातूरजवळील उदगीरचे. एकोणतीस वर्षांपूर्वी मीलमध्ये काम करीत असताना त्यांना आपल्या उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला. तीन महिने त्यांना घरी बसावे लागले. मीलमध्ये पुन्हा त्यांना कामावर घेतले. मात्र, शक्य ते काम होत नसल्याने वरिष्ठांकडून मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे पुन्हा दीडच महिन्यांत काम सोडावे लागले. कुटुंबाची जबाबदारी असल्याने पैसे कमावणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी एका हातात सायकल घेऊन त्यावरून पाव विक्रीचा फिरता व्यवसाय सुरू केला. हळूहळू ते एका हाताने सायकल चालवू लागले. सात-आठ वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. दरम्यान, रोजगारासाठी पुण्यात आलेला त्यांचा मुलगा भिंतीवरून पडल्याने त्याच्या पायाला अपघात झाला. त्याच्या मदतीसाठी हसन चाचाचे कुटुंब पुण्यात आले. येथे आल्यावर त्यांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली. त्यामुळे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.