संयुक्त तपास मोहिमेदरम्यान दोन हस्तकांना अटक
बानिहाल/ जम्मू – जम्मू भागात दहशतवादी कारवाया पसरवण्याचा एक मोठा कट आज उघड केला आहे. यासंदर्भात जम्मू आणिकश्मीरमधील रामबान जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पूंछ, राजौरी, रायसी, उधमपूर आणि रामबान जिल्ह्यांच्या गूल रामबन पट्टयात आणि दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्हा 2000 सालापर्यंत विदेशी भाडेकरूंसाठी प्राधान्याचे ठिकाण होते. याच भागात विदेशी हस्तकांचा वावर असायचा.
या भागात जम्मू काश्मीर पोलिस, लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि 9 पाराच्या संयुक्त पथकाने गूल रामबन पट्टयात केलेल्या तपास मोहिमेदरम्यान पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील चरसू गावातील शौकत अहमद शेख आणि कुलगाम जिल्ह्यातील मलिपूरा तवील मोहीउद्दीन दर या दोघांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघेही विशीतील तरुण असून त्यांच्याकडून एके-47 रायफल, मॅगझिन, 30 राउंड आणि 8,771 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
काही देशविरोधी घटकांच्या संशयास्पद हालचाली आढळल्याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावर संयुक्त पथकाने पहाटे 3.30 वाजता या तपास मोहिमेला सुरुवात केली होती. अटक केलेले दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाचे हस्तक असून ते दोघेही नवीद उर्फ अबू तल्ला या सक्रिय दहशतवाद्याच्या सूचनेवरून हालचाली करत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या दोघांबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
जम्मू काश्मीरच्या दक्षिणेकडील पीर पंजाल विभागात दहशतवादी कारवायांना चिथावणी देण्याचा लष्कर ए तोयबाचा
कट या दोघांच्या अटकेमुळे उघड झाल्याचे लष्कराच्या उधमपूरस्थित उत्तर विभागाचे जनसंपर्क अधिकारी ले.क.अभिनव नवनीत यांनी सांगितले.