पुणे – शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये असणाऱ्या “ब्लॅक स्पॉट’वर वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबर वाहतुकीच्या प्रश्नांवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी मागील काही महिन्यांपासून शहर वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे काम करणार आहे. याबाबत आजवर दोन्ही प्रशासनाच्या चार बैठका झाल्या आहेत. प्रशासनाकडून शहरातील “ब्लॅक स्पॉट’वर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याबाबत झालेल्या बैठकीमध्ये अपघातांबाबत उपाययोजनेसाठी देण्यात आलेल्या सूचनांनुसार काम सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील वारजे आणि विमानतळ वाहतूक विभागामध्ये प्रत्येकी चार तर कोंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा आणि हडपसर विभागांमध्ये प्रत्येकी दोन आणि सहकारनगर, वानवडी विभागांमध्ये प्रत्येकी एक असे सुमारे 18 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. प्रशासनाकडून या सर्व ठिकाणी स्पीड ब्रेकर, रिप्लेक्टर, साईन बोर्ड आदी उपाययोनजा करण्यात येत आहेत. कोंढवा परिसरातील खडीमशीन चौक येथे रस्ता रुंदीकरण, झेब्रा क्रॉसिंग रंगवणे आणि पादचारी सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगर रस्त्यावरील तारकेश्वर मंदीर ते दर्गा येथील मार्गावर दुभाजक बसवण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या उपाययोजनांबरोबरच रेल्वे स्टेशन परिसर, सातारा रोड परिसर, खडीमशीन चौक ते उंड्री चौक या परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.