काळेवाडी -राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले नामफलक तात्काळ काढून योग्य ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहन चालकांच्या व परराज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी सभोवतालच्या गावालगत दिशादर्शक नामफलक लावले आहेत. परंतु, या फलक चुकीच्या ठिकाणी लावले आहेत. बालेवाडीकडून देहुरोडकडे जाताना महामार्गालगत वाकडगावचा दिशादर्शक फलक बालेवाडीकडे लावण्यात आला आहे. तसेच ते नामफलक नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होऊन कुंचबना होत आहे. येत्या पाच दिवसात या महामार्गालगत गावालगतच्या ठिकाणी लावलेले नामफलक योग्य ठिकाणी व दुरूस्त करून न लावल्यास शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.