वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने अलिकडेच ज्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या त्यातून त्यांनी अमेरिकेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला जात असला तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्या घटनेला विश्वासघात मानण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही क्षेपणास्त्रे अगदीच अल्प पल्ल्याची होती. त्यांनी अण्वस्त्रांच्या आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या न करण्याचे आश्वासन दिले आहे त्याचा त्यांनी भंग केलेला नाही. सुरूवातीलाही मला असेच वाटले होते की त्यांनी विश्वासघात केला आहे पण आता मात्र त्यांनी तसे केलेले नाही अशी आपली धारणा झाली आहे असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले.
उत्तर कोरियाचे प्रमुख किम यांच्याशी चांगले आपले संबंध आहेत. पण अलिकडच्या काही घडामोडींमुळे त्यांनी आपला विश्वास गमावला आहे असे मला वाटू लागले होते पण आता मात्र तसे काही नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे ते म्हणाले. ट्रम्प आणि किम यांच्यात दोनवेळा थेट चर्चा झाल्या आहेत. पण अजून किम यांनी आंतराष्ट्रीय समुदायाने ज्या अटी किंवा शर्थी त्यांच्यावर घातल्या आहेत त्यावर अंमल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उत्तर कोरियावर घालण्यात आलेले निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध उठवण्यात यावेत यासाठी स्वता किम प्रयत्नशील आहेत. त्याच उद्देशाने त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांशी दोनवेळ थेट चर्चा केली असली त्यातून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नाही.