विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना
नवी दिल्ली – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आणि त्यांचे पुत्र खासदार दिपेंदरसिंह हुड्डा हेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही जागा जिंकल्यास सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या अपेक्षा वाढू शकतात.
दिपेंदरसिंह रोहतक मतदारसंघाचे खासदार आहेत. रोहतकमध्ये कॉंग्रेसला विजयाची संधी असल्यानेच प्रियांका गांधी या मतदारसंघात प्रचाराला आल्या होत्या. सोनपतमध्ये भूपिंदरसिंह हुड्डा यांची लढत भाजपचे खासदार रमेश कौशिक यांच्याशी आहे. जाट मतांचे ध्रुवीकरण करण्यावर हुड्डा यांनी भर दिला आहे. तर बिगर जाट मते भाजपच्या उमेदवाराला मिळावीत, असे डावपेच भाजपने आखले आहेत.
तसेच हुड्डा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते पक्षाचे संसदीय सचिव होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची सारी सूत्रे आपल्या हाती राहावी किंवा सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रिपदावर दावा करणे शक्य व्हावे या उद्देशाने सोनपतमध्ये विजय मिळविणे हुड्डा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळेच त्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.
जमीन गैरव्यवहारांवरून भाजपने हुड्डा कुटुंबीयांना प्रचारात लक्ष्य केले आहे.
हुड्डा मुख्यमंत्रिपदी असतानाच रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनीचे वादग्रस्त व्यवहार झाले होते. शेतकऱ्यांकडून स्वस्तात जमीन खरेदी करून ती मोठय़ा बांधकाम व्यावसायिकाला चढ्या दराने विकून वढेरा यांनी आर्थिक फायदा करून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या साऱ्या व्यवहारांमध्ये हुड्डा यांनी मदत केली होती. यातूनच सध्या हुड्डा यांना विविध चौकशांना सामोरे जावे लागत आहे. हुड्डा पिता-पुत्र जिंकल्यास कॉंग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व वाढणार आहे.