कामशेत – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी दुचाकी खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. कामशेत खिंडीजवळ मंगळवारी (दि.7) पहाटे ही घटना घडली.
विवेक विलास सुवारे (वय 25, रा. गोरेगाव, मुंबई) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 7) जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे पहाटेच्या सुमारास विवेक दुचाकीवरून (एम.एच. 47 ए.इ. 2859) जात होता. रस्ता न समजल्याने विवेक मातीच्या ढिगाऱ्यातून सुमारे 200 फूट दुचाकी फरफटत जाऊन खड्ड्यात पडली. या अपघात पहाटेच्या सुमारास झाला, मात्र माहिती सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या माणसांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी कामशेत पोलीस तपास करीत आहेत.