दोन सॅंपल ताब्यात : अन्न व औषध प्रशासन करणार तपासणी
पुणे – सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू आहे. या काळात अनेक व्यापारी आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मार्केटयार्डातील आंबा व्यापारावर छापा टाकला आहे.
तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर शुक्रवारी सायंकाळदरम्यान छापा टाकण्यात आला. हापूस आंब्याचे दोन सॅम्पल घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतरच दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी उल्हास इंगवले यांनी दिली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, मार्केटयार्डात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर अक्षय्यतृतीया आली आहे. आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडला बंदी आहे, मात्र इथेपॉन पावडरला परवानगी आहे. त्यावर ही तपासणी सुरू आहे.