आम्ही मागणी केली पण; भाजपलाच इच्छा नव्हती

विषय समित्या आणि प्रभाग समित्यांबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांची भावना

पुणे –
“लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र आलो असून आमची युती कायम आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती. तसेच आम्ही चार प्रभाग समित्या मागितल्या, तरी ते किमान दोन समित्या देऊ शकत होते. मात्र, त्यांना आम्हाला सत्तेत वाटा देण्यात रस नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी भाजपबाबत नाराजी व्यक्त करणात येत आहे.

त्यामुळे “आम्ही युती धर्म पाळत त्यांच्या सोबत राहणार असून ईश्‍वर त्यांना सदबुद्धी देवो,’ असेही शिवसेना पदाधिकारी म्हणत आहेत. लोकसभेसाठी एकत्र आल्यानंतर महापालिकेतही या दोन्ही पक्षांची पुन्हा युती झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेने उपमहापौर, चार प्रभाग समित्यांची अध्यक्षपद तसेच शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, ही मागणी पालिका स्तरावर झाली होती.

तर भाजपच्या नेत्यांकडून संपर्क प्रमुख अथवा शहरातील नेत्यांनी याबाबत चर्चा करावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रभाग समित्या आणि विशेष समित्यांच्या जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षात एकमत झाले नाही. त्यातच, भाजपने शहर सुधारणा तसेच महिला आणि बालकल्याण समिती वगळून क्रीडा अथवा विधि समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला देण्याची तयारी दाखविली.

मात्र, त्यावर एकमत तसेच वरिष्ठांशी चर्चा न झाल्याने भाजपनेच या सर्व पदांवर आपले उमेदवार दिले आहेत. मात्र, त्यामुळे शिवसेनेच्या गटात नाराजीचा सूर आहे. “भाजपला आम्हाला सत्तेत वाटा देण्याबाबतच शंका असून आम्ही मागणी केलेली पदे देण्यास तयार नाहीत. तसेच आम्ही 4 प्रभाग समित्या मागितल्या असल्या तरी ते आम्हाला 2 समित्या देऊ शकत होते. मात्र, त्या दिल्या नाहीत,’ अशी नाराजीच नाव न छापण्याच्या अटीवर पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. मात्र, त्यानंतरही आम्ही युती धर्म पाळला असून आमच्या नगरसेवकांनी विशेष समित्यांसाठी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे, असाही दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.