मुंबई – कॉग्निझंट कंपनीने आगामी वर्षात महसूल मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आपला ताळेबंद जाहीर करताना सांगितले आहे. याचा परिणाम एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या वर झाला. त्यामुळे शेअरबाजारात माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या शेअरची जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले. याचा परिणाम मुख्य निर्देशांकावरही झाला.
शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 18 अंकांनी कमी होऊन 38,963 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 12 अंकांनी कमी होऊन 11,712 अंकावर बंद झाला. या आठवड्यात दोन दिवस सुट्या होत्या. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 104 अंकांनी तर निफ्टी 42 अंकांनी कमी झाला.
शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय तंत्रज्ञान, आरोग्य, आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक 1.91 टक्क्यापर्यंत कमी झाले. तर दूरसंचार रिऍल्टी, वाहन आणि बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढले.मिडकॅप आणि स्मॉल कॅप 0.1 टक्केपर्यंत कमी झाले. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 597 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 791 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
शुक्रवारी टीसीएस, एचयूएल, टाटा स्टील, एचसीएल टेक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एचडीएफसी, इंडस्इन बॅंक, एशियन पेंन्टस्, आयटीसी, वेदांत या कंपन्यांचे शेअर 3.70 टक्क्यांपर्यंत घसरले. तर भारती एअरटेल, आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी कंपन्यांचे शेअर 3.11 टक्क्यांपर्यंत वाढले.
“इराणवरील निर्बंधामुळे क्रुडचे दर वाढतील असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात क्रुडचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वाढत आहे. या कारणामुळे शेअर बाजारात कमी अधिक प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे. मात्र आगामी काळात निवडणूकांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय सेवा