सासपडे येथील क्रशर व्यावसायिकांना नोटिसा

ग्रामस्थांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रदूषण मंडळाची कारवाई

नागठाणे – 
सासपडे (गणेशखिंड) ता. सातारा येथील सहा खडीक्रशर उद्योगांना प्रदूषण वैध परवाना घेतला नसल्याकारणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच कडक शब्दात नोटिसा बजावल्या आहेत. येथील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या नोटिसा काढण्यात आल्या असून या सहाही खडीक्रॅशर प्लॅंटमूळे सासपडे परिसरात प्रदूषण होत असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास प्लान्ट बंद करण्यात येतील असा उल्लेखही करण्यात आला आहे. यामुळे येथील क्रशरमालकांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सासपडे (गणेशखिंड) येथील डोंगराच्या पायथ्याला ए. एस. स्टोन क्रशर, महेश स्टोन क्रशर, पूनम स्टोन क्रशर, गंगोत्री स्टोन क्रशर, यशराज स्टोन क्रशर व चैतन्य स्टोन क्रशर अशी सहा खडी क्रशर उद्योग गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. या सहाही खाणींमुळे सासपडे परिसरात प्रदूषण होत असल्याची व शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची तक्रार वारंवार येथील ग्रामस्थ करीत होते. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत होते.

या सहाही दगडखाणी शासनाचे नियम धाब्यावर बसवून येथे सुरू असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांचा होता. याच अनुषंगाने 3 मार्च रोजी सासपडे येथील शिवसेनेचे अमोल यादव यांनी येथे ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन केले. व त्याची तक्रार सातारा तहसीलदार यांच्याकडे केली होती. तहसीलदारांनी कारवाईसाठी तक्रार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे पाठवली होती. प्रदूषण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्यांनी 18 मार्च रोजी या सहाही खाणींना भेट दिली.

या पाहणीदरम्यान या अधिकाऱ्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या असून त्यापैकी बऱ्याच त्रुटी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे समजते. हे सहाही खडीक्रशर उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैध प्रमाणपत्राशिवाय सुरू आहेत. क्रशर प्लान्ट, कन्वेअर बेल्ट योग्यरित्या पत्रे लाऊन बंदिस्त केलेले नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर धुळीचे उत्सर्जन होत आहे. पाणी फवारणी यंत्रणा व फोगर यंत्रणा बसवलेली नाही. क्रशर परिसरात पक्का रस्ता करण्यात आलेला नसल्याने धुळीचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होऊन हवा प्रदूषित होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे परिसरात पुरेशी झाडे लावली गेली नाहीत.

क्रशरभोवती हवा प्रतिबंधक भिंत उभारली नाही या सहाही क्रशरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत असून हवेचे प्रदूषण होत आहे व भेटीदरम्यान क्रशरची प्रदूषण नियंत्रण कार्यालयाची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत अशा गंभीर बाबींचा या ताकीद नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याबाबत प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल 5 दिवसांत सादर करावा अन्यथा क्रशर बंद करण्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात येतील अशी सक्त ताकीद या नोटिसीमध्ये बजावण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी या नोटिसा सहाही क्रशरना पाठविण्यात आल्या असून या ताकीद नोटिसांमुळे त्यांच्यात चांगली खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.