अहमदनगर : काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर येथील जाहीर सभेपासून स्वतःला दूर ठेवत काँग्रेस सोडून ‘भाजप’ प्रवेशाबाबतच्या बातम्यांना छेद दिला. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवण्याचा रेटा लावून धरल्यानंतर देखील आघाडी झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. नाराज झालेल्या सुजय यांनी भाजपची वाट धरत अहमदनगरमधून तिकीट देखील मिळवले. मात्र पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी (आज) अहमदनगर येथे नियोजित दौरा असल्याने पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील ‘भाजप’वासीय होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये होत्या मात्र विखे-पाटलांनी आपल्या मुलाच्या मतदारसंघात आलेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेस अनुपस्थिती लावत आपला काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा कोणताही इरादा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
तत्पूर्वी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी आज सकाळीच एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांचे वडील काँग्रेससोडून भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले होते. आपल्या वडिलांची नाराजगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असून काँग्रेसबाबत त्यांच्या मनामध्ये आकस नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होत.
दरम्यान, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असली तरी काँग्रेसचे जेष्ठ नेते असणारे राधाकृष्ण विखे-पाटील हे अहमदनगरमधून आपल्या मुलाविरोधात उभा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संग्राम जगताप यांचा प्रचार करणार नाहीत. राधाकृष्ण विखे-पाटील हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचा अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या आपल्या पुत्रास जाहीर पाठिंबा राहणार आहे.
असे असले तरी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपल्या मुलाच्या मतदारसंघात प्रचारसभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला अनुपस्थिती लावत आपण काँग्रेस सोडणार नसल्याचाच इशारा दिला असून आपली नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असल्याच्या भूमिकेस दुजोरा दिल्याचं मानलं जात आहे.