भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यात शिक्षक संवर्गाची संख्या मंजुरीपेक्षा कमी असून याचा पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्र्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने भोर तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष व सचिवांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याध्यापक पदाची ७ पदे मंजूर असून यातील एकच पद कार्यरत आहे. ६ पदे रिक्त आहेत. म्हणजे ८६% पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांची ९१ पदे मंजूर आहेत. मात्र, यातील अवघी १७ पदे कार्यरत असून ७४४ पदे रिक्त आहेत. म्हणजेच ८२% पदे रिक्तच आहेत. भाषा पदाविधरांची ८६ पदे मंजूर असून यात ६२ पदावर शिक्षक कार्यरत असून २४ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण २८% एवढे आहे.
शास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षकांची ३ पदे मंजूर असून ५७ शिक्षक कार्यरत ५४ पदे अतिरीक्त आहेत. उप शिक्षकांची ९०२ पदे मंजूर असून यातील ४२५ पदांवर शिक्षक कार्यरत असून १७७ पदे रिक्त असून ३०% पदे रिक्त आहेत. एकूणात ७८९ पदे मंजूर आहेत तर यातील ५६२ पदे कार्यरत असून २८१ पदे रिक्त अतिरिक्त पदे ५४ आहेत असे निवेदनात म्हटलेले आहे.
भोर तालुक्यात ४१ शाळा या बदलीप्रक्रिया, सेवानिवृत्ती अशा कारणांमुळे शून्य शिक्षकी झाल्या आहेत. बदली प्रक्रियेमध्ये भोर तालुक्यात नेमणूक मिळालेल्या ४२ शिक्षकांनी न्यायालयात पिटीशन दाखल केल्याने ते शिक्षकही भोर तालुक्यात रुजू झालेले नाहीत.
भोर तालुक्याच्या डोंगराळ व दुर्गम भागात शिक्षकांची संख्या लक्षणियरित्या कमी आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मात्र अतिरिक्त शिक्षक दिसून येतात. जिल्ह्यामध्ये समानीकरणाची प्रक्रिया राबवून भोर तालुक्यावर होणारा अन्याय दूर करावा, शिक्षकांच्या कमी संख्येचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. तसेच शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे.
शाळापातळीवर राबवावयाचे शासकीय उपक्रम व योजना प्रभावीपणे अंमलात आणता येत नाहीत, शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने त्याचाही विपरित परिणाम होत आहे.
शिक्षकांची कमतरता दूर करावी…
पवित्र पोर्टलद्वारा पुणे जिल्ह्यात नेमणूक मिळालेल्या शिक्षकांपैकी जास्तीत जास्त शिक्षकांना भोर तालुक्यात नेमणूक देऊन भोर तालुक्यातील शिक्षकांची कमतरता दूर करावी, तरी कृपया आपले स्तरावरून याबाबत ठोस पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.